एका मोठ्या शाळेतील तिसरी ब तुकडी. या वर्गात एका चिमणीने घरटे बांधले. मुलांच्या भावविश्वात ही मोठी घटना होती. चिमणीने अंडी दिली..यथावकाश पिले बाहेर आली. रोज काही तरी घडत होते. घरट्यात काय चालले आहे हे दुसऱया तुकडीतील मुलांना सांगताना ब तुकडीतील मुले भाव खायची. एकदा त्या वर्गात मराठीचा तास सुरू होता. त्या घरट्यातील मुलांचा बाबा असलेला चिमणा अचानक घरट्यातून बाहेर उडाला आणि पंख्याच्या पात्याला धडकून खाली पडला. तिथल्या तिथे त्याचा जीव गेला. शेजारच्या बाकावरच्या मुलीने घाबरून बाईंना बोलावले. बाईंबरोबर वर्गातील बाकी मुलेही गोळा झाली. मेली ती चिमणा…बाईंनी जाहीर केले आणि अत्यंत कोरडेपणाने साऱयांना आपापल्या जागेवर जाऊन पुढचा अभ्यास सुरू करण्यास सांगितले. मुलं धाकाने जागेवर बसली खरी पण मनातले विचार काही थांबत नव्हते. त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. चिमणा बाबा मेला म्हणजे कुठे गेला. तो मेल्याचे चिमणीला आणि पिलांना कोण सांगेल. चिमणीने आणलेला चारा पिलांना पुरेल का..एक ना अनेक प्रश्न. त्यातल्या त्यात एकीने माहिती पुरवली की चिमणा बाबा आता देवाघरी गेला. देवाघरी गेलेल परत येत नसतात. चार-पाच दिवस मुलं नाराज होती. नंतरही टीव्हीवरून, आसपासच्या भागात मुलांना मृत्यू भेटत होता व मुलं आपल्या परीने तो समजून घेण्याचा प्रयत्न करत होती.
खरंच काय वाटतं मुलांना मृत्यूबद्दल? पालकांना आपले मूल या विषयापासून जितके लांब राहील तितके लांब हवे असते. आता टीव्हीवरील बातम्या, सिनेमा यांतून मृत्यू सतत समोर येत असतो. तरीही आपल्या घरी किंवा शेजारी कोणी वारलं की आधी मुलांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी कुठेतरी पाठवतात.
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या मृत्यूविषयीच्या संवेदना वेगवेगळ्या असतात. सात-आठ महिन्यांच्या नीलूची आजी अचानक हृदयविकाराने वारली. नीलूला आजीची सवय झाली होती. ते चार-पाच दिवस नीलू खूप रडली. या वयातील मुलांना मृत्यू साहजिकच समजत नसतो. पण घरातल्या नेहमीच्या सवयीच्या माणसांची अनुपस्थिती, नवीन माणसांची उपस्थिती ते अचूक ओळखू शकतात.
मध्यंतरी एक चित्र पाहण्यात आले. एक पाच-सहा वर्षांचा मुलगा आपल्या आईच्या थडग्याजवळ बसलेला असतो. केस विस्कटलेले, शर्ट गबाळा, बाजूला दप्तर पडलेलं. तो रडून आईला सांगत असतो, तुझी झोप झाली असेल तर ऊठ ना आता. माझ्या टीचर रोज मला रागवतात की तुझ्या आईचं तुझ्याकडं लक्ष नाही. कधीच छान केस विंचरून, नेटके कपडे घालून पाठवत नाही.
तीन ते सहा या वयातल्या मुलांचा मरणांकडं पाहण्याचा दृष्टीकोन साधारणपणे असाच असतो. त्यांना मृत्यू ही एक तात्पुरती गोष्ट वाटते. आतापर्यंत आपल्यासोबत असणारा माणूस अचानक आपल्यात नाही म्हणजे चमत्कारच मानतात ते. आणि नंतर उलटा चमत्कारही होऊ शकतो, असं त्यांना वाटतं.
नंतर सहा ते नऊ या वयातील मुलांना मृत्यू कळू लागतो. एका शाळेची बस अपघातात पाण्यात बुडाली. काही मुलांना वाचवण्यात लोकांना यश आलं. पण काही बुडाली. वाचलेल्या मुलांना आपण वाचलो या आनंदापेक्षा बुडणाऱया मुलांची जीवाच्या आकांताने चाललेली शेवटची धडपड बघितलेली असल्याने तो धक्का मोठा होता. खूप काळजीपूर्वक बोलून मुलांना त्यातून बाहेर काढावं लागलं. या मुलांना मृत्यू म्हणजे नेमके काय हे समजत असले तरी त्याबद्दल त्यांच्या मनात शंका असतात. स्वर्ग-नरक या संकल्पना कानावर पडलेल्या असतात. मग आपल्या जवळपासचं कोणी वारलं की ते स्वर्गात जातील की नरकात. की त्यांचा पुनर्जन्म झाला असेल का? किंवा एखादी व्यक्ती म्हातारी नव्हती तर मग अचानक कशी मेली? आता या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण नीट देऊ शकतोच असं नाही.
साधारणपणे नऊ वर्षांनंतरच्या मुलांची मृत्यूची समज मोठ्यांसारखी झालेली असते. मृत्यू अटळ आहे. आपले आई-वडीलपण एक दिवस आपल्याला सोडून जाणार हे त्यांना कळून चुकते. त्यामुळे घरात एखादा मृत्यू झाल्यास ते काही दिवस नेहमीसारखे वागतात. पण त्या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झालेला असतो. त्यांच्या वागण्यातून ते नंतर जाणवत राहते. त्यामुळे मृत्यूची ओळख जेव्हा केव्हा मुलांना होते, त्यावेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे न देता नेमकी माहिती आपणच दिली पाहिजे. तरंच त्यांच्या मनावरच्या आघाताची तीव्रता कमी होईल.